मुंबई -मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार असून गेल्या दोन महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संपर्कात येणारे दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेते, दूधविक्रेते, सुरक्षा रक्षक आदी सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर दादर येथील मीनाताई ठाकरे फुल मंडईतील 215 व्यापारी आणि कामगारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 6 हमाल आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
कोरोना चाचण्या -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असताना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरु करण्यात आले. यामुळे सर्वत्र गर्दी होऊ लागल्याने रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांच्या रोज संपर्कात येणारे भाजीवाले, फेरीवाले, दूधवाला, सुरक्षा रक्षक आदी सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. अशा चाचण्या केल्याने रुग्ण आढळून आल्यास इतरांना होणारा संसर्ग रोखता येणे शक्य होणार आहे.
6 जण पॉझिटिव्ह -
कोरोना संसर्ग वाढत असल्याने आज माॅ मिनाताई ठाकरे फुल मंडईत पालिकेच्या जी उत्तर विभागामार्फत 215 दुकानदार, कामगार, हमाल आदींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात एकाही दुकान मालकाला कोरोना झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र मंडईत हमाली करणारे 6 हमाल, कामगार कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्याना पुढील उपचाराकरीता वनिता समाज हाल शिवाजी पार्क येथे दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नो मास्क नो एंट्री -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मंडईच्या प्रवेशद्वारावर मंडळाच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. जी व्यक्ती मास्क लावत नाही त्याना मंडईत प्रवेश दिला जात नाही. व जे मास्क लावत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. सदर मंडईचे व्यापारी मंडळ कोरोनाला रोखण्याकरीता सहकार्य करीत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.