मुंबई- लॉकडाऊनमध्ये अन्न धान्य वाहतुकीसाठी वाहनांना विशेष परवानगी देण्यात आली आहे. या विशेष परवानगीचा आणि लॉकडाऊनचा फायदा गुटखा तस्कर घेत आहेत. ट्रक-टेम्पोवर शासन असा लोगो चिकटवत यंत्रणांची फसवणूक करत अन्नधान्याच्या नावाखाली गुटख्याची तस्करी करत असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) समोर आली आहे. ही बाब एफडीएच्या कांदिवलीतील कारवाईतून स्पष्ट झाली आहे. एफडीएने 51 लाख 65 हजार 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त करत दोघांना अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला 51 लाखांचा गुटखा;लॉकडाऊनमध्ये तस्करी सुरुच - mumbai news
एफडीएने कारवाई करत 51 लाख 65 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये ही गुटखा तस्करी जोरात सुरु असल्याचे चित्र आहे.
एफडीए गुप्त वार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली एम. जी. रोड येथील हिंदुस्थान नाका येथे 11 मे ला छापा टाकला गेला. त्यावेळी एका ट्रकवर समोरच्या काचेवर शासन असा कागद चिकटवण्यात आला होता आणि त्यातून अन्नधान्य नेत असल्याचे सांगण्यात आले. एफडीएने या ट्रकची कसून तपासणी केली असता यात गुटख्याचे 16 बॉक्स दिसून आले. यामध्ये विमल आणि रजनीगंधा गुटखा-पानमसाला सापडला.
अन्न सुरक्षा कायदा, कोविड-19 संदर्भातील कायदा मोडल्या प्रकरणी आणि सरकारी यंत्रणाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने आता पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती एफडीएने माहिती दिली आहे.