मुंबई : आरोग्यक्षेत्रात नोकरीची संधी हवी असलेल्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेद व होमोओपॅथिक महाविद्यालये व रुग्णालयातील क व ड गटातील पदे रिक्त आहेत. २७ संस्थांमधील ही रिक्त असलेली ५ हजार कुशल व अकुशल असलेली पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५०५६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा : राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमोओपॅथिक महाविद्यालये व रुग्णालयातील क व ड गटातील कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामधील ५०५६ पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाने राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे ११ जानेवारीला मंजुरीसाठी पाठवला होता. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील रुग्णालये आणि महाविद्यालये यामधील क आणि ड विभागातील ५०५६ पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या नियमांचे करावे लागणार पालन : रुग्णालये आणि महाविद्यालये यामधील रिक्त असलेली ५०५६ पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरताना शासनाच्या ६ डिसेंबर २०२२ च्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नियमित पदे भरल्यावर जितका खर्च होणार आहे. त्यापेक्षा २० ते ३० टक्के बचत होणे आवश्यक आहे. ५०५६ पदे भरताना होणारा खर्च वेतन या शीर्षकाखाली खर्च न करताना कंत्राटी सेवा या शीर्षकाखाली खर्च करावा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला दिले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.