मुंबई- राज्यात आज ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ९४ हजार ८०९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४३ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८ लाख ३७ हजार १३३ नमुन्यांपैकी १६ लाख ६६ हजार ६६८ (१८.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १२ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २७ हजार ६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मागील पंधरा दिवसात रुग्ण संख्या घटली
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती, तर कोरोनाची भीतीही वाढत होती. पण, मागील सोळा दिवसात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. मागील ९ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या १८ ते २४ हजाराहून थेट ५ ते ८ हजारांवर आली आहे. सोमवारी (२७ ऑक्टोबर) तर राज्यात केवळ ३ हजार ६४५ रुग्ण आढळले होते.
रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या जवळ
राज्यातील कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. तर, कोरोना मृतांची संख्याही घटली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातच ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.
हेही वाचा-मुंबई महापालिका पैशाने श्रीमंत असली तरी सत्ताधारी वृत्तीने दरिद्रीच - अतुल भातखलकर