मुंबई -शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. अशा राखीव जागांसाठी ५ हजार ३७१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
१७ मार्च रोजी ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी एकूण १४ हजार १३५ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५ हजार ३७१ विद्यार्थी लॉटरी पद्धतीने निवडण्यात आले आहेत, तर ३ हजार ४२१ विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ५३ विद्यार्थी हे एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांकरिता व इतर १ हजार ३१८ विद्यार्थी अन्य बोर्डचे आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असल्या कारणाने प्रवेशाची पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही.
२०२०-२०२१ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झालेले असल्याने आरटीईच्या प्रवेशासाठी सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्याची जबाबदारी पडताळणी समितीकडे देण्यात आली आहे.
यासाठी पालकांना शाळांमधून मेसेज पाठवून ठराविक तारखांना बोलावून घेतले जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत प्राप्त करुन घेतले जाईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे तशी नोंद ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यानंतर पालकांकडील ‘अलॉट्मेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला’ अशी नोंद करून पालकांना परत केले जाणार असून त्यासाठी पालकांकडून एक हमीपत्र भरून घेतले जाईल.
काही विद्यार्थी आणि पालक मूळगावी किंवा अन्य जागी स्थलांतरीत झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक हजर झाले नाही, तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी. तसा ‘एसएमएस’ त्यांना पाठवण्यात यावा. दुस-यांदा दिलेल्या तारखेला पालक उपस्थित न राहिल्यास तिस-यांदा तारीख देण्यात यावी, अशाप्रकारे पालकांना तीन वेळा संधी देण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत, त्यांना त्या शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर माहिती देण्यात यावी. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा द्यावी, असेही शिक्षण विभागाकडून कळवण्यात आले आहे.