मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार आहेत. अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. तर ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (Electoral Photo ID Card –ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते. ज्या नागरिकांकडे, असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येते. मतदाराच्या नावात, पत्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे.
इपिक कार्ड मिळाले नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा. तेथे ओळखपत्र मिळण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर ओळखपत्र मिळण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.