मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात ४५३ गुन्हे दाखल झाले असून याप्रकरणी आतापर्यंत २३९ जणांना अटक करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह व्हाट्सअपवर मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअरप्रकरणी १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत.
इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ऑडिओ क्लिप्स, यू-ट्यूबचा गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे.
मुंबई विभागातील काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २८ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या मोबाईलवरील व्हाट्सअपद्वारे विविध व्हाट्सअप ग्रुप्सवर कोरोनाग्रस्त नागिरकांबद्दल चुकीची व खोटी माहिती पसरवून, त्यांची नावेदेखील जाहीर केली होती. तसेच कोरोनाग्रस्त नागरिकांची नावे जाहीर न करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले होते.