मुंबई : राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज राज्याभरात तब्बल 450 रुग्णांची तर 3 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत देखील 135 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद असल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटचे आतापर्यंत 230 रुग्ण आढळून आले आहेत. इन्फ्लूएन्झाच्या एच 3 एन 2 चे 5 मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोना रूग्णसंख्येची आकडेवारी : राज्यात आज 450 रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथील प्रत्येकी एका अशा एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 316 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 81 लाख 42 हजार 509 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 79 लाख 91 हजार 728 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नव्या व्हेरियंटचे रुग्णसंख्येत वाढ : राज्यात आजपर्यंत एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे येथे 151, औरंगाबाद 24, ठाणे 23, कोल्हापूर 11, अहमदनगर 11, अमरावती 8, मुंबई 1, रायगड 1 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाकी सर्व रुग्ण बरे झाले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. त्याठिकाणी सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.