मुंबई :जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत स्विझरलँडमधील दावोस येथील परिषदेला उपस्थित राहिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दालनाला भेट दिली. या ठिकाणी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची बाजी :दाओस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून महाराष्ट्र राज्याला भरभरून गुंतवणूक मिळावी या प्रयत्नात मुख्यमंत्री आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशीच्या बैठकीत अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
१० हजार तरुणांना रोजगार :याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आज दाओस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत तब्बल ४५,९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांना रोजगार मिळणार आहेत.