मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची ( Measles patients in Mumbai ) संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ३२३ रुग्णांची तर ४२७२ संशयित रुग्णांची नोंद ( 4272 suspected Measles patients ) झाली आहे. गोवर मुळे आतापर्यंत १५ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या २२ रुग्ण ऑक्सीजनवर, २ रुग्ण आयसीयुमध्ये तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
२२ रुग्ण ऑक्सीजनवर - मुंबईत ५८ लाख ३६ हजार ६९१ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४२७२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ३२३ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ११७ बेडवर रुग्ण असून २१३ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ९३, १५४ ऑक्सीजन बेड पैकी २२, ३५ आयसीयु बेडपैकी २ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १४ हजार १०५ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ५५ हजार १३१ मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ ठिकाणी गोवरच्या पॉजीटीव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३५६९ बालकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.