मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्यावत केली जात आहे. मात्र, दलित आणि मुस्लीम मतदार सत्ताधाऱ्यांना मते देत नसल्याने त्यांनी सुमारे ४० लाख मतदारांची नावे गाळल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे.
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे
बी. जी. कोळसे पाटील यांनी जनता दलाच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, देशभरातून १२ कोटी तर राज्यातून ४० लाखांच्या वर मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले आहे. यात मुस्लीम आणि दलित मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे यामागे नक्कीच भारतीय जनता पक्ष आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
ही नावे नेमकी कशी गहाळ झाली ? यासंबंधीचा सविस्तर अहवाल सय्यद खालिद सैफुला यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मिसिंग अॅपची निर्मिती केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोगाने याची दखल घेऊन मतदार याद्या अद्यावत कराव्यात, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र दिले असल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले. आंध्र प्रदेशमध्ये आजही शनिवार-रविवार मतदार यादी अद्यावत करायचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानेही मतदारांच्या याद्या अद्यायावत कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सर्जिकल स्ट्राईकबद्दल विश्वास कसा ठेवायचा, कोळसे पाटलांचा प्रश्न
आतापर्यंत सत्ताधारी पक्षाने त्यांना पाहिजे तेच करून घेतले आहे. आम्हाला सैन्य दलाबद्दल आदर आहे. मात्र, सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारकडून कोणतीही खरी माहिती दिली जात नाही. याकारणाने आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.