मुंबई - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 434 पोलीस कोरोनाग्रस्त आढळले असून 4 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत राज्यात 212 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 22 पोलीस अधिकारी आणि 190 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात 434 पोलिसांना कोरोनाची लागण; तर 4 जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या 24 तासात 434 पोलीस कोरोनाग्रस्त आढळले असून 4 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 20, 801 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. 2288 पोलीस अधिकारी तर 18, 513 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 3883 पोलीस कर्मचारी हे कोरोना ग्रस्त म्हणून उपचार घेत आहेत. यात 512 पोलीस अधिकारी तर 3771 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 16, 706 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 1754 पोलीस अधिकारी तर 14, 952 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत कलम 188नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 60 हजार 174 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइन नियम मोडणाऱ्या 860 जणांवर कारवाई केली आहे. राज्यभरात 358 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 894 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात, 35 हजार 86 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 96 हजार 164 वाहने जप्त केली असून तब्बल 25 कोटी 33 लाख 28 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. तर वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 76 घटना घडलेल्या आहेत.