मुंबई -जगभरात हजारो नागरिकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूने आता मुंबईत प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाचे ३ रुग्ण सापडले होते. हिंदुजा रुग्णालयातील रुग्णांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता ४ झाली आहे. दरम्यान इराणहुन आणलेल्या ४४ जणांना नेव्हल डॉकच्या रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
चीनच्या वुहान प्रांतातील कोरोना विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. भारतातही या विषाणूने शिरकाव केला असून महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आधी पुण्यात रुग्ण सापडले. त्यांच्या सोबत प्रवास केलेल्या २ जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी मुंबईमधील हिंदुजा रुग्णालयात एका ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या निकटवर्तीय ७ नातेवाईकांना याच रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सानिध्यात आलेल्या इतर ७ जणांना त्यांच्या घरी देखरेखी खाली राहण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -राज्यात आणखी ३ कोरोनाबाधित आढळले, रुग्णांची संख्या १४ वर