मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या आणि हजारो नागरिकांचे बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसचे आतापर्यंत मुंबईत एकूण 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 रुग्ण आधीचे असून शनिवारी 4 रुग्ण आढळले आहेत. एकूण 9 रुग्णांपैकी 5 रुग्ण मुंबईमधील आहेत. तर ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या रुग्णांनी परदेशात प्रवास केला होता. त्यांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे उप-मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले आहे.
मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत 5 कोरोनाचे रुग्ण होते. त्यात पुण्याच्या रुग्णाच्या सानिध्यात आलेले 2, हिंदुजा रुग्णालयातील 1, तर ठाण्यातील 1 रुग्ण होता. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच हिंदुजामधील रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर शनिवारी मुंबईत आणखी 4 रुग्ण सापडले आहेत. त्यात हिंदुजामधील रुग्णाचा आणखी एका नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या सर्वांवर मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु असल्याचे शाह यांनी सांगितले.
हिंदुजा रुग्णालयातील रुग्णाच्या इतर 8 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. मुंबई बाहेरील सर्व रुग्णांची माहिती त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची व सहवासात आलेल्यांची माहिती गोळा केली जात असल्याचेही शाह यांनी सांगितले. हिंदुजा रुग्णालयातील रुग्णाच्या सहवासात आलेल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता, त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
- कोरोनाबात कारवाई -