मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 394 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 15 युनिट्सचे कोरोना लसीकरण केंद्र सुरू
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 394 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 7 हजार 563 वर पोहचला आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 326 वर पोहचला आहे. 511 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 89 हजार 811 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 520 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 531 दिवस
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 531 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 203 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 2 हजार 290 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 27 लाख 56 हजार 738 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, तर 26 जानेवारीला 342 म्हणजेच, सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी आई वडिलांनी जमा केले 16 कोटी