मुंबई - मुंबईमध्ये जागोजागी उंच इमारती बांधल्या जातात. अशा उंच इमारती बांधताना त्यामध्ये सुरक्षा आणि आगीपासून वाचण्यासाठी यंत्रणा कार्यरत नसतात. यामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये एकूण ३८४१ आगीच्या घटना नोंद झाल्या. त्यात १०० जणांचा मृत्यू झाला. तर २९८ लोक जखमी झाले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले. महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६ च्या अंमलबजावणी का करत नाही? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.
दहा वर्षात ४८ हजार ४३४ आगीच्या घटना -
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे आगीबाबतची आकडेवारी मागवली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आल्याचे शेख यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून याआधी २००८ ते २०१८ या दहा वर्षात किती आगीच्या घटना घडल्या याचीही माहिती मागवली होती. या दहा वर्षाच्या काळात गेल्या २००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीत ४८ हजार ४३४ आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यात १५६८ गगनचुंबी इमारतीचा समवेश आहे. तसेच ८७३७ रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. तसेच ३८३३ व्यासायिक इमारतीत आग लागली आहे. ३१५१ झोपडपंट्ट्यांमध्येही आग लागली आहे.