मुंबई- धारावीतील 5 कोरोना हॉटस्पॉटमध्ये मुंबई महानगर पालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)आणि धारावी-माहीम-माटुंगा मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने 10 एप्रिलपासून थर्मल स्क्रिनिंग सुरू केले होते. त्यानुसार आतापर्यंत 37 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढच्या दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती स्क्रिनिंग टीमचे नेतृत्व करणारे डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली आहे. या 5 ही हॉटस्पॉटमधील नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाल्यानंतर धारावीत पुढच्या हॉटस्पॉटकडे आम्ही मोर्चा वळवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
दिलासादायक! धारावीतील 5 हॉटस्पॉटमधील थर्मल स्क्रिनिंग दोन दिवसात होणार पूर्ण
आतापर्यंत 37 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढच्या दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती स्क्रिनिंग टीमचे नेतृत्व करणारे डॉ अनिल पाचणेकर यांनी दिली आहे.
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बातमीने तमाम मुंबईकरांच्या पोटात गोळा आला होता. पण पालिका, आयएमए आणि स्थानिक डॉक्टरांनी पुढे येत हे मोठे संकट दूर करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला. त्यानुसार डॉक्टर आणि 3 आरोग्य कर्मचारी यांचा समावेश असलेल्या 5 टीम तयार करत मदिना नगर, मुस्लीम नगर, कल्याणवाडी, मुकुंद नगर आणि अन्य एका ठिकणी अशा 5 पहिल्या हॉटस्पॉटमध्ये स्क्रिनिंगला सुरुवात केली. 10 एप्रिलपासून हे काम सुरू झाले असून सात दिवसात 37 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे. यापैकी 500 जणांना राजीव गांधी क्रिडा संकुलसह अन्य ठिकणी क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 210 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यात 25 टक्के कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून उर्वरीत रिपोर्ट लवकरच येतील, असे ही डॉ. पाचणेकर यांनी सांगितले आहे.
आता या हॉटस्पॉटमध्ये काही हजार नागरिकांचेच स्क्रिनिंग होणे बाकी असून ते दोन दिवसांत आम्ही पूर्ण करू. त्यानंतर पुढच्या हॉटस्पॉटमध्ये काम सुरू करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान डॉक्टरांच्या या कामाचे सगळीकडून कौतुक होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही त्यांच्या कामाची दखल घेत कौतुक केले आहे.