ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 3 हजार 600 ते सात हजारांपर्यंत भरघोस वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली. 3 हजार 600 ते 7 हजार 200 रुपयांची वेतनपर्यंत वेतनवाढ करण्यात आल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली.
एसटी
By
Published : Nov 24, 2021, 10:44 PM IST
|
Updated : Nov 25, 2021, 4:40 PM IST
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली. 3 हजार 600 ते 7 हजार 200 रुपयांची वेतनपर्यंत वेतनवाढ करण्यात आल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह येथे कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरु होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळास समोर ठेवला होता. तसेच शिष्टमंडळाने याबाबत पर्याय द्यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकाळपासून मॅरेथॉन बैठक झाली. एसटी कामगारांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते. पाच तास चर्चा चालली. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना वेतनवाढीबाबत घोषणा केली.
दरमहा वेतनाची हमी
एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, तसेच संपकाळात निलंबित व सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. पण, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री परब यांनी सांगितले. वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून सुमारे 700कोटींचा बोजा पडणार आहे. किमान पाच ते सात हजार रुपयांची वेतनवाढ दिली असून नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासून देण्यात येईल. तसेच दर महिन्याच्या 10 तारखेला वेतन देण्याची हमी राज्य शासनाने घेतल्याचे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.