मुंबई -धारावी परिसर सुरुवातीला कोरोना हॉटस्पॉट बनले होते. धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने देखील धारावी पॅटर्नचे कौतुक केले. मात्र, आता धारावीमधील रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. शुक्रवारी धारावीत कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीत पुन्हा कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धारावीला पुन्हा कोरोनाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 33 रुग्ण - धारावी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला धारावीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्याचे जगभर कौतुकही झाले. मात्र, आता पुन्हा धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण येथे आढळले.
मुंबईत सुरुवातीला कोरोनाचा कहर सुरू असताना धारावीत दिवसाला 80 ते 90पर्यंत रुग्ण आढळत होते. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या धारावीत कोरोनावर कसे नियंत्रण मिळवणार, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे उभा राहिला होता. मात्र, ही भीती सत्यात उतरण्या अगोदरच महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रुग्णसंख्या कमी-कमी होत अगदी एकपर्यंत खाली आली. जागतिक दर्जाच्या 'वॉशिंग्टन पोस्ट'नेही धारावीतील कोरोना नियंत्रणाची दखल घेतली. सर्वत्र धारावी पॅटर्नचे अनुकरण करण्यास सुरुवात झाली असताना धारावीत आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
आता 33 नवीन रुग्ण आढळल्याने धारावीची एकूण रुग्णसंख्या 2 हजार 883 वर गेली आहे. त्यापैकी 2 हजार 489 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 124 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. काल दादरमध्येही 33 रुग्ण आढळले. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या 2 हजार 916 झाली आहे. दादरमध्ये आतापर्यंत 2 हजार 368 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 454 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. माहिममध्ये सर्वात जास्त म्हणजे 39 रुग्ण आढळले असून तेथील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 614 झाली आहे. त्यापैकी 2 हजार 95 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 432 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.