मुंबई :राज्यात वीज दरवाढ प्रस्तावाविरोधात नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. १५ फेब्रुवारी या हरकती दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ३२४६ हरकती नोंद झाल्या आहेत. याशिवाय ईमेलद्वारे अनेक हरकती गेल्या आहेत. त्या मान्य होतील असे नाही. परंतु याशिवाय अनेक ग्राहकांनी हार्ड कॉपी दाखल केलेल्या आहेत. त्या निश्चितच मान्य होणार आहेत. त्यामुळे एकूण हरकतींची संख्या ५००० किंवा अधिक होऊ शकते.
प्रचंड संख्येने हरकती नोंद : मागील सुनावणीच्या वेळी फेब्रुवारी २०२० मध्ये एकूण २३०० हरकती दाखल होत्या. त्याशिवाय यावेळी ई फाईलिंग व ई हायरिंगमुळे हरकती दाखल करणे सर्वसामान्य वीज ग्राहकांना अडचणीचे व गैरसोयीचे झाले होते. यावेळी विविध ग्राहक व औद्योगिक संघटना यांनी स्वतःहून यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने हरकती नोंद झाल्या आहेत. त्याबद्दल या सर्व संघटना व सर्व संबंधित ग्राहक प्रतिनिधी यांचे समन्वय समितीच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच आभार मानण्यात आल्याचे वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.
वीजदरवाढी विरोधात जनजागृती :महावितरणने मागणी केलेली ६७,६४४ कोटी रुपये म्हणजेच सरासरी ३७ टक्के म्हणजेच सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील सध्याचेच वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर आणावेत या मागणीसाठी व या वीजदरवाढी विरोधात जनजागृती करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत सभा, मेळावे, बैठका, बोर्डस, बॅनर्स, हँडबिल्स, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या सर्व समाज माध्यमे याद्वारे प्रचार व प्रसार करण्यात येईल. त्याचबरोबर स्थानिक आमदार, खासदार व मंत्री यांची समक्ष भेट घेऊन ही दरवाढ रद्द करणे का आवश्यक आहे? याची संपूर्ण माहिती देण्यात येईल. सोबतच राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह याप्रश्नी निर्णायक बैठक व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन : त्यानंतर या वीजदरवाढीच्या विरोधात संपूर्ण राज्यात मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता 'वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन' करण्यात येईल. यावेळी राज्यात सर्वत्र स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवर मोर्चे आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल व राज्य सरकार व महावितरण यांना निवेदन देण्यात येईल. तसेच राज्यात जेथे शक्य होईल, तेथे ग्राम सभेमध्ये वीजदरवाढ विरोधी ठराव करून शासन, कंपनी व आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यातील जागरूक वीज ग्राहक व विविध ग्राहक संघटना यांनी हा आंदोलन कार्यक्रम संपूर्ण ताकदीनिशी राबवावा, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने निमंत्रक प्रताप होगाडे यांनी केले आहे.
हेही वाचा : Today Gold Silver Rates: तुमच्या शहरात सोने चांदीचे दर, वाचा एका क्लिकवर