महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 30 हजार रेमडेसिवीर, तर 300 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा कायम - ऑक्सिजन तुटवडा न्यूज

राज्यात ऑक्सिजन-रेमडेसिविरची मोठी टंचाई आहे. आज राज्यात दिवसाला 62 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला केवळ 30 ते 35 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे दिवसाला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असताना आजही ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही.

Mumbai
Mumbai

By

Published : Apr 19, 2021, 9:38 PM IST

मुंबई :मुंबईत गंभीर कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आजच्या घडीला 10 टक्के रुग्ण गंभीर असून त्यांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत आहे. पण ऑक्सिजन आणि इंजेक्शनची ही मागणी खूपच मोठी असून त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजन-रेमडेसिविरची मोठी टंचाई आहे. आज राज्यात दिवसाला 62 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला केवळ 30 ते 35 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे दिवसाला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असताना आजही ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. आजही 300 मेट्रिक टनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरुच असून आम्ही शक्य ते प्रयत्न साठा वाढवण्यासाठी करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे येणारा साठा मिळण्यासाठी आणखी किमान 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हा साठा अंदाजे 150 मेट्रिक टनचा असेल. त्यामुळे ऑक्सिजनचा तूटवडा कायम राहणार असून रेमडेसिविरचाही प्रश्न गंभीर होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

10 टक्के रुग्ण गंभीर

मार्च 2020 ला राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिकांना कोरोनाची लागण झाली. दिवसाला 20 ते 25 हजार रुग्ण आढळत होते. पण आरोग्य यंत्रणानी ही लाट नियंत्रणात आणण्यास डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी यश मिळवले. 2021 च्या सुरुवातीला तर 2500 ते 3000 हजार रुग्ण राज्यात आढळू लागले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पण मार्चमध्ये कोरोनाने हाहाकार उडवून दिला. परिणामी आज राज्यात 67 हजारांहून अधिक रुग्ण दिवसाला आढळत आहेत. आज राज्यात 6 लाखापेक्षा अधिक रुग्ण सक्रिय आहे. तर यातील 10 टक्के रुग्ण साधारणतः गंभीर आहेत.

50 टक्केच इंजेक्शन?

10 टक्के म्हणजेच 60 हजारांहून अधिक रुग्ण राज्यात गंभीर आहेत. अशावेळी या रुग्णांसाठी दिवसाला 60 हजार इंजेक्शनची मागणी आहे. पण सद्या 30 हजार इंजेक्शनचा तुटवडा आहे. म्हणजेच आज राज्यात 50 टक्केच इंजेक्शन दिवसाला उपलब्ध होत असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टंचाई सुरूच राहणार?

ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता आता केंद्र सरकारने मदतीचा हात देत महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'च्या माध्यमातून ऑक्सिजन राज्यात येणार आहे. मात्र हे ऑक्सिजन येण्यासाठी किमान 10 दिवस लागतील अशी माहिती ही या अधिकाऱ्याने दिली आहे. रेल्वेने ऑक्सिजन आणणे अत्यंत कठीण बाब आहे. रेल्वेचा वेग किती असावा, ऑक्सिजनचे टँकर वरच्या तारांना लागणार तर नाहीत ना अशा अनेक बाबी तपासत, चाचणी करत त्यानंतर ऑक्सिजन येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्राकडून 150 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा यानंतर ही ऑक्सिजनची गरज 100 टक्के पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा आम्ही आणखी पर्याय शोधत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details