मुंबई- गोरेगावच्या आंबेडकरनगरमध्ये बुधवारी रात्री घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेला होता. या चिमुकल्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु, चिमुकला अद्यापही सापडला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून परिसरातील इतर ३ मेनहोल उघडून महापालिकेचे आपत्ती निवारण पथक या चिमुरड्याचा शोध घेत आहे.
गोरेगावच्या आंबेडकरनगरमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला आणि चुकून उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरू केला.