मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. ज्या अॅपद्वारे आचारसंहिता भंग करणाऱ्या तक्रारी करू शकतो, अशा सी -व्हिजिल अॅपवर आतापर्यंत नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत ३ हजार २११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या तक्रारींपैकी १ हजार ८६६ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या अॅपवर अनधिकृत दारू, मतदारांना अमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे १५ हजार ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ३३७ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ४८ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक असे १३ हजार ७०२ गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत ६०१ गुन्हे दाखल आहेत.