मुंबई -जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सतत वाढत आहेत. मुंबई परिसरात शुक्रवारी नव्या तीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील दोन आणि कल्याणमधील एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या तीन रुग्णांची नोंद झाल्याने मुंबई परिसरातील रुग्णांची एकूण संख्या 21 झाली आहे. मुंबईमधील एका रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाल्याने मुंबईमधील 10 आणि मुंबई बाहेरील 10 अशा एकूण 20 रुग्णांवर महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पालिकेच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. तसेच कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. तो गेले काही दिवस व्हेंटिलेटरवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला आहे. या विषाणूने आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रूग्णांचा आकडा 52 वर गेला आहे. यात 21 रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत गुरूवारपर्यंत 18 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी तीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईमधील एका 62 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने इंग्लंड येथे प्रवास केला होता. 14 मार्चला हा रुग्ण मुंबईत परतला होता. 18 मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला मधूमेह आणि कर्करोग हे आजार आहेत.
मुंबईमधील आणखी एका 38 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने तुर्कीला प्रवास केला होता. 14 मार्चला हा रुग्ण मुंबईत परतला. 18 मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्याण येथील 53 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने दुबईला प्रवास केला होता. 4 मार्चला तो मुंबईत परतला. त्याला 19 मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात गेल्या 24 तासांत 540 बाह्य रुग्ण तपासण्यात आले. दरम्यान, 114 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी मुंबईमधील दोन आणि मुंबईबाहेरील एक अशा तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कस्तुरबा रुग्णालयातून 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 127 रुग्ण भरती आहेत. सेव्हन हिल रुग्णालय, मिराज हॉटेल, निरंता हॉटेल आदी क्वारेंटाईनची सुविधा असलेल्या ठिकाणी एकूण 118 आंतरराष्ट्रीय रुग्णांना होम क्वारेंटाईन करून ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. दक्षा यांनी दिली.
हेही वाचा -बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू