मुंबई- शहरात कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या धारावीतून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी धारावीत थर्मल स्क्रिनिंग करणाऱ्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांमध्ये कोणतीही लक्षणे नसून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
धारावीत स्क्रिनिंग करणाऱ्या 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण - dharavi corona news
स्क्रिनिंग संपल्यानंतर आयएमएने खबरदारी म्हणून 25 डॉक्टरांची कोरोना चाचणी केली होती. यात 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
10 ते 17 एप्रिलदरम्यान धारावीतील 5 हॉटस्पॉटमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. गल्लीबोळात जाऊन 40 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग करत 83 पॉझिटिव्ह रुग्ण जीवाची बाजी लावत या डॉक्टरांनी शोधून काढले. हे स्क्रिनिंग संपल्यानंतर आयएमएने खबरदारी म्हणून 25 डॉक्टरांची कोरोना चाचणी केली होती. यात 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या डॉक्टरांना त्वरीत क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना एकाला सोमय्या तर दोघांना धारावीतील साई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयएमएचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर हे तीन्ही डॉक्टर अगदी ठणठणीत आहेत, त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.