मुंबई- दरवर्षी पावसाळ्यात शहरातील झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडतात. त्यात अनेक लोकांचा मृत्यू होतो. गेल्या आठ वर्षातील झाड पडून मृत्यू झालेल्यांची संख्या २९ वर पोहोचली आहे. तर यावर्षीची आकडेवारी पाहता झाडे आणि झाडांच्या फांद्या पडून एका महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील महिनाभरात झाडे आणि त्यांच्या फांद्या अंगावर पडून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठ वर्षात घडलेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल २९ जणांचा बळी गेला आहे. हे प्रमाण वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान यामुळे पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत माहिती देतांना विरोधी पक्ष नेते रवी राजा
मिळालेल्या माहितीनुसार १८ मे ला अंधेरी येथे झाड पडले होते. त्यात मिरारोडचे रहिवाशी असलेले सी. के. गोपालकृष्णन (३७) जखमी झाले होते. त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचा मणका तुटल्याने त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र, २३ मे ला त्यांचा मृत्यू झाला होता. जुहू येथे २८ जून रोजी अंबिका काळे (२०) या कंत्राटी कामगाराच्या अंगावर आंब्याचे झाड पडून तीचा मृत्यू झाला. १३ जून रोजी अंधेरी महाकाली केव रोड तक्षशिला सोसायटी येथे अनिल नामदेव घोसाळकर (४५) यांच्या अंगावर झाड पडले. त्यांना जवळच्या हॉलिस्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, १४ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. १४ जून रोजी मालाड परिसरात झाडाची फांदी कोसळून शैलेश मोहनलाल राठोड या ३८ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला होता. याच दिवशी रात्री गोवंडी येथे झाड कोसळून नितीन शिरवळकर यांचाही (४३) मृत्यू झाला आहे.
धोकादायक झाडे पडून नागरिकांचा मृत्यू होत असला तरी पालिकेकडून मात्र अद्यापही किती झाडे धोकादायक आहेत याचे सर्वेक्षणच सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेचा ढिसाळ कारभार - रवी राजा
गेल्या काही वर्षात झाडे पडून मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. पालिकेने झाडे कापण्यासाठी १४ कंत्राटदार नेमले असून दोन वर्षासाठी १०० कोटी रुपये या कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी करावी लागते. मात्र पालिकेने झाडे कापण्यासाठी ज्या कंत्राटदारांना नेमले आहे, त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने झाडे कापण्याचे ज्ञानच नसून ज्यांच्याकडे झाडांचा कचरा वाहून नेण्यासाठी गाड्या आहेत त्यांनाच पालिका कंत्राट देते ही गंभीर बाब आहे. यावरून पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, पूल धोकादायक असल्यास पालिका पूल पाडते मग धोकादायक झाडांवर नुसते फलक लावण्यापेक्षा ती झाडे तोडत का नाही, असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. रवी राजा यांनी मृतांच्या परिजनांना योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
५ दिवसात ३३१ झाडे पडली
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे तसेच झाडांच्या फाद्यां कोसळण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी पडलेल्या पावसात झाडे पडून सात जणांना जीव गमावावा लागला होता. यंदाही पहिल्याच पावसांत झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार वाऱयासह सरी कोसळत आहेत. या दरम्यान रोज झाडे पडण्याच्या घटना सुरु आहेत. आतापर्यंत पाच दिवसांत ३३१ झाडे पडल्याची नोंद झाली आहे.
मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडे
२०१८ मध्ये पूर्ण झालेल्या वृक्ष गणनेनुसार, महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.
आकडेवारी
अ.क्र | वर्ष | एकूण मृत्यू |
१ | २०१२ | १ |
२ | २०१३ | ० |
३ | २०१४ | ० |
४ | २०१५ | ९ |
५ | २०१६ | ३ |
६ | २०१७ | ४ |
७ | २०१८ | ५ |
८ | २०१९ | ७ |