मुंबई -पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर आरपीएफ आणि सीमा शुल्क विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरपीएफ पोलिसांनी विदेशी ब्रांडची 260 किलो अवैध सिगारेट जप्त केली आहे. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी सीमा शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.
अशी केली कारवाई-
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरपीएफ पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती, की ट्रेन क्रमांक 09020 हरिद्वार-बांद्रा-टर्मिनस विशेष एक्सप्रेसच्या पार्सल डब्यातून बेकायदेशीर अंमली पदार्थ घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने यांची पार्सल कार्यालयाला माहिती दिली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने सापळा रचला. हरिद्वार-बांद्रा टर्मिनस विशेष एक्स्प्रेस गाडी येताच, आरपीएफ पोलिसांनी पार्सल डब्याची सखोल चौकशी केली आणि तब्बल 27 पार्सल जप्त केले. त्यानंतर याची माहिती सीमा शुल्क विभागाला देण्यात आली.
27 पार्सल जप्त-
सीमा शुल्क विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच जप्त पार्सल खोलण्यात आले. या 27 पार्सलमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी
सिगारेट आढळून आले. ज्यामध्ये मार्लबोरो गोल्ड, डनहिल, एस्से लाइट व्हाइट, एस्से चेंज ब्लू, एस्से गोल्ड लीफ ब्लॅक आणि बेन्सन एंड हेजेज सारख्या ब्रांडच्या सिगारेटचा समावेश आहे. सीमाशुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीनुसार, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (व्यापार व वाणिज्य प्रतिबंध व उत्पादन नियमन, उत्पादन, पुरवठा व वितरण) सीओटीपी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच सिगारेटच्या विदेशातून आणल्याचे प्राथमिक निदर्शनात आले आहे. त्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी सिगारेटचे 27 पार्सल जप्त केले आहे.
सीमा शुल्क विभागाकडून चौकशी सुरू-
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस पार्सलमधील एकूण 1226 सिगारेटचे डब्बे होते. ज्याचे वजन 260 किलो इतके आहे. सीमा शुल्क विभाग या घटनेची चौकशी करत आहे. पार्सल मालक आतापर्यंत मिळालेले नाही. हे पार्सल कुठून आले? मुंबईत यांचे कनेक्शन काय याची संपूर्ण चौकशी सीमाशुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत एकाही व्यक्तीला याप्रकरणात अटक झालेली नाही. हे संपूर्ण प्रकरण आता सीमा शुल्क विभागाला वर्ग करण्यात आले आहे.
हेही वाचा -धक्कादायक: सांगलीत मृत महिलेवर केले उपचार, डॉक्टरवर गुन्हा दाखल