ईटीव्ही भारत विशेष : 26/11 मुंबई हल्ल्यातील साक्षीदार छोटूला काहीतरी सांगायचंय !
छोटू चहावाल्यासमोरच कसाबने एका चिमुकलीवर गोळी झाडली. हे पाहून छोटूने बाहेर भीतीने सैरावैरा धावणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या आरामकक्षात नेले. समोर मृत्यू उभा असतानाही जीवावर उदार होत, त्याने शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचवले. त्याच्या शौर्याचे कौतुकही झाले. सरकारने त्याला नोकरीचे आश्वासनही दिले. मात्र, मागील 12 वर्षांत त्याची पूर्तता झाली नाही.
मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊनमुळे अजूनही मुंबईची लोकल बंद आहे. त्यामुळे स्थानकालगत असणाऱ्या फेरीवाला व छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी जखमींना मदत करणारा आणि त्या घटनेचा साक्षीदार छोटू चहावालाही आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटामुळे मुंबई सोडण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. टाळेबंदीत छोटूचे चहाचे दुकानही बंद होते. अनलॉकची घोषणा झाल्यानंतर दुकाने उघडली तरी, ग्राहकच नसल्याने पोट भरायचे कसे, असा प्रश्न आता छोटूला पडला आहे. या स्थितीचा आढावा घेतला ईटीव्ही भारतने...
कोण आहे 'छोटू चहावाला'?
मुंबई हल्ल्यावेळी शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या 'छोटू चायवाला' याच्या जीवनावर आता चित्रपट येणार आहे. या हल्ल्यावेळी मोहम्मद तौफीक शेख ऊर्फ 'छोटू चायवाला' हा सीएसएमटी स्थानकावरील एका तिकीट खिडकीवर नेहमीप्रमाणे चहा घेऊन उभा होता. त्यावेळी सगळ्यात आधी कसाब-इस्माईल यांचा छोटू चहावाल्याशी आमनासामना झाला. यावेळी कसाबने शिवीगाळ करत छोटू चहावाल्यावर गोळीबारही केला.