मुंबई- गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्र रूप धारण केले. रात्री ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढावी लागली. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत विविध घटनांमध्ये तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसत गेले चार दिवस ठाण मांडून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्ररूप धारण करत मुंबईकरांची दैना उडवून दिली. जवळपास ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस पडल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी तब्बल ३०० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी मध्यरात्री १ ते ३ या दोन तासाच्या कालावधीत २५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. रोद्ररुप धारण केलेल्या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते वाहतूक कोलमडली होती. ठप्प झालेली मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल १४ तासांनी सुरू झाली.
मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून २२ जणांचा बळी गेला. मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर मालाड सब वे येथे पाणी साचल्याने स्कॉर्पियो गाडीमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात घडलेल्या या विविध घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चांदिवलीत जमीन खचल्याने तेथील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री परिसरातही गुडघाभर पाणी साचले होते. मिठी नदीचे पाणी साचल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरुप आले होते. परिसरातील १६०० कुटुंबीयांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
घाटकोपर पूर्वेला पंतनगर व जवळच असलेल्या खाडीपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले होते. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर क्र.१ मधील म्हाडाच्या बैठ्या चाळीत घराघरात पाणी शिरले. कुर्ल्यात राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले. २४ तासात कुलाबा येथे ५७१.५ मिमी व सांताक्रुझ येथे ९८२.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धावणारी मुंबई कोलमडून पडली. रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने तिन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले होते. हार्बर व मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी १४ तासानंतर सुरू झाली.
७७ बसचे मार्ग बदलले --
जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेसना मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे ७७ बसेसचे मार्ग बदलण्यात आले होते. ५८ बसेस पाण्यात अडकल्या होत्या, तर १५२ बसेस नादुरुस्त झाल्या. त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.