मुंबई -राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळानेही आपला अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने http://www.maa.ac.in/academic-year-syllabus-2020-2021/ या
संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
पहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम होणार कमी कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी शालेय शिक्षण विभागाकडून राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच शाळांना आणि विद्यार्थ्यांनाही त्यासाठीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शालेय शिक्षण विभागाकडून केल्या जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका जीआरमध्ये सांगण्यात आले आहे.
राज्यात 15 जूनपासून शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली असली तरी अद्यापही प्रत्यक्षात शाळा आणि महाविद्यालयांना सुरुवात झाली नाही. सर्व ठिकाणी ऑनलाइन शाळा आणि त्यांचा अभ्यासक्रम सुरू आहे. नुकतेच विभागाने पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण ऑनलाइन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने या पार्श्वभूमीवर तूर्तास शाळा सुरू होऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्याने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने हा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी खूप उशीर केला असल्याची टीका महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने आपला अभ्यासक्रम कमी करावा यासाठीची वेळोवेळी मागणी या संघटनेकडून केली जात होती. मात्र, त्यासाठीचा निर्णय अगोदरच घेतला असता तर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता, असे घागस यांनी सांगितले. मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई प्रमुख प्रशांत रेडीज यांनीही शालेय शिक्षण विभागाच्या या उशिरा आलेल्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षक मुख्याध्यापक संघटना यांचे विचार ऐकूनच घेतले जात नसल्याने हा सर्व त्यांचा गोंधळ उडाला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.