मुंबई -मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनला रात्री आग लागली. या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने रात्री 2.20 च्या सुमारास नियंत्रण मिळवले असून 25 जणांची आगीतून सुखरूप सुटका केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे जे.जे हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टर या हॉटेलमध्ये राहत होते. त्या सर्वांना हॉटेल ट्रायडंटमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांच्या राहण्याची सोय मरिन लाईन्समधील धोबी तलावाजवळ असलेल्या ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये करण्यात आली होती. हे हॉटेल मरिन स्ट्रीट क्रमांक 1 येथे आहे. रात्रीच्या वेळी फॉर्च्युन हॉटेलच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर आग लागली. काही वेळातच ही आग वेगाने चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच 5 फायर इंजिन आणि 4 वॉटर टँकरसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर फायर ब्रिगेडकडून आगीच्या कूलिंगचे काम करण्यात आले.