मुंबई - मूळच्या हिमाचल प्रदेशच्या असलेल्या आणि मुंबईत रिक्षा चालवणाऱ्या 74 वर्षीय देशराज सिंह यांची हृदयस्पर्शी कहाणी ह्यूमन्स ऑफ बॉम्बे इन्स्टिट्यूटने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. लोकांना देशराज यांची ही कहाणी खूप आवडली आणि अल्पावधीतच ती व्हायरल झाली. यादरम्यान देशराज यांच्यासाठी ऑनलाईन देणगीची मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत त्यांच्यासाठी 20 लाख रुपये उभे करण्याचे लक्ष्य होते. लोकांचा या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळून त्यांच्यासाठी एकूण 24 लाख रुपये जमा झाले आहेत. आता ही संपूर्ण रक्कम नुकतीच त्यांना धनादेशाच्या रूपात देण्यात आली आहे.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे इन्स्टिट्यूटने त्यांच्या फेसबुक पेजवर ऑटोरिक्षाचालक देशराज यांचे प्रोफाइल तयार केले. त्यांची कहाणी त्यात शेअर केली गेली. देशराज सध्या त्यांच्या कुटुंबासाठी कमाई करणारे एकमेव व्यक्ती आहेत. वयाच्या 74 व्या वर्षीही ते ऑटोरिक्षा चालवून पैसे मिळवतात. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी अशी एकूण चार अपत्ये होती. यातील दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या कुटुंबात, त्यांची पत्नी, सून आणि चार नातवंडे आहेत. दिल्लीत आपल्या नातवाला शिकवण्यासाठी त्याने आपले घरही विकले असल्याचे काही अहवालांत म्हटले आहे.
क्राऊड फंडिंगच्या मदतीने अल्पावधीतच 24 लाख जमा
मदत म्हणून 24 लाख रुपये मिळाल्यानंतर ह्यूमन्स ऑफ बॉम्बे इन्स्टिट्यूटने आपल्या पेजवर लिहिले की, 'देशराज यांना मिळालेला आधार अतुलनीय आहे. जसे आपण त्यांच्या मदतीसाठी पुढे आलात, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ते त्यांच्या नातवंडांना चांगले शिकवू शकतील.
क्राऊड फंडिंगच्या मदतीने जमलेल्या एकूण 24 लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश त्यांना देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी मदत जमा करताना जरी 20 लाखांचे लक्ष्य ठेवले गेले होते, तरीही लोकांच्या प्रेमामुळे ही रक्कम वेळेपूर्वीच 24 लाखांवर गेली.