मुंबई - मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रात्री भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. गुरुवारी रात्री लागलेल्या आगीवर आज (रविवारी) पहाटे 5 वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही आग विझवण्यासाठी काल शनिवारी रात्री 7 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे 178 तर पालिकेचे 51 असे एकूण 228 टँकर पाणी वापरण्यात आले. याबद्दल मुंबई महापालिकेकडून माहिती देण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ सिटी सेंटर मॉल आहे. तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची ही इमारत आहे. या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्याना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने रवाना केली. आग विझवण्याचे काम सुरू असतानाच आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळत नसल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाने शुक्रवारी पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी 'ब्रिगेड कॉल'ची घोषणा केली. शुक्रवारी दुपारी 3.37 वाजता म्हणजेच तब्बल 18.30 तासांनी सर्व बाजूने आग कव्हर करण्यात आली. मात्र आग विझवण्याचे काम शनिवारीही सुरूच होते. अखेर या आगीवर आज रविवारी पहाटे 5 वाजता म्हणजेच तब्बल 56 तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग विझवल्यानंतर आता अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन सुरू केले आहे.