मुंबई - गोरेगाव आरेमधील मेट्रोच्या कार डेपोसाठी २२०० झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. ही झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत आहेत. सदर झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव दोन वर्ष रखडला होता. मात्र आता शिवसेना आणि भाजपची युती झाली असल्याने मंगळवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २२३८ झाडे कापण्यास, ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहे तशीच ठेवण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रथम वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. परंतु, यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही झाडे कापण्याच्या प्रस्तावावरील निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरणप्रेमी तसेच वृक्षप्रेमींचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १० ऑक्टोबर २०१८ रोजी लोकांकडून हरकती आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केला होता. तत्पूर्वी २१ सप्टेंबर २०१८ रोजी या खात्यातील अधिकार्यांनी याची पाहणी केली होती. ४ जुलै २०१९ रोजी वृक्षप्राधिकरण सदस्यांनी याची पाहणी केली. त्यानुसार हा प्रस्ताव पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.