मुंबई : कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांचे आणि जाणकारांचे लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष काय डावपेच आखणार यावर आता चर्चा सर्वत्र घडू लागली आहे. अशात भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाकडून लोकसभेच्या जागांविषयी मोठे विधान करण्यात आले आहे. शिंदे गट आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 22 जागांवर उमेदवार देणार असल्याचे विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या जागा फॉर्म्युलाच्या चर्चेनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या जागा वाटपाची चर्चा जोर धरू लागली आहे.
वर्षा बंगल्यावर 22 जागा घेण्याची भाषा :कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात लोकसभा 2024 ची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष हे आपआपली रणनीती तयार करत आहेत. लोकसभेत भाजपला शह देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. तर राज्यातील महाविकास आघाडी जागा वाटपासाठी चाचपणी करत आहे. आता भाजपसोबत सत्तेत असलेला शिंदे गटाची शिवसेना कामाला लागली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीविषयी खासदारांसोबत चर्चा झाली. तसेच शिवसेना लोकसभेत 22 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. भाजप आणि शिंदे गट लोकसभेसाठी कशाप्रकारे जागा वाटप केले जाणार याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांना दिली.
बैठकीत शिंदे गटाचं काय ठरलं : बुधवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या खासदारांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती देताना शेवाळे म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कामांचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीत विजय मिळेल, विजय मिळण्यास फायदा होईल असे काय करता येईल, यावरदेखील चर्चा झाली.