मुंबई :नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, माजी विद्यार्थी सहयोग अशा वेगवेगळया निकषांवर मूल्यांकन करून महाविद्यालयाला दर्जानुसार श्रेणी प्रदान केली जाते.उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रिया बंधनकारक करण्यात आले आहे. तरी सुद्धा राज्यातील हजारो खाजगी महाविद्यालयांनी हे मुल्यांकन केले नाही. परिणामी चूक महाविद्यालयाची आणि सजा विद्यार्थ्यांना का म्हणून असा सवाल आता विद्यार्थी संघटना शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
एकदाही ‘नॅक’ मुल्यांकन न केलेल्या संस्था : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषेदकडून आतापर्यंत एकदाही मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे. प्रोव्हिजनल अॅवक्रिडिटेशन फॉर कॉलेजेस असे या योजनेचे नाव आहे. या मूल्यांकनाची मुदत दोन वर्षांसाठी होती. राज्यातील पारंपरिक महाविद्यालयांपैकी 2000 विनाअनुदानित महाविद्यालयांनी आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना आता मूल्यांकन करून घ्यावे लागेल. अन्यथा, त्यामधील पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे शासनाने ठरवलेले दिसत आहे.
करोना काळात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया मंदावली : कोरोना काळात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती. मात्र राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांपैकी बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालयांनी आतापर्यंत नॅक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या फेब्रुवारीच्या आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात विनाअनुदानित 2,139 महाविद्यालयांपैकी केवळ 138 महाविद्यालयानी ही प्रक्रिया केली आहे. याचा अर्थ 2000 महाविद्यालयानी ही प्रक्रिया केलीच नाही.