मुंबई - दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर अनिल परब यांनी सीआरझेड, नागरी विकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) मध्ये बांधलेला साई रिसॉर्ट हा अनधिकृत आहे. स्वतःच्या आमदारकीचा, मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्ट पद्धतीने सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बांधला आहे, असे स्टेटमेंट २० साक्षीदारांनी दिले. ज्यात अनिल परब यांचे मित्र, भागीदार, सरकारी अधिकारी सहभागी आहेत, अशी माहिती खा. किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमैया म्हणाले की, माहितीच्या अधिकाराखाली मी कागदपत्रे मिळवली आहेत. त्यात अनिल परब यांचे स्वतःचे स्टेटमेंट आहे, की त्यांनी स्वतःच्या रिसॉर्टमध्ये ६ कोटी रुपये रोख खर्च केले असे सांगितले आहे. आयकर खात्याची, व ईडीची कागदपत्रे आहेत. अनिल परब यांचे लाभार्थी, अकाउंटंट, साथीदार यांचे स्टेटमेंट आहेत. या साक्षीने अनिल परब हे गुन्हेगार आहेत, हे सिद्ध होते असेही किरीट सोमैया म्हणाले आहेत.
माहितीच्या अधिकारात मिळवली कागदपत्रे - किरीट सोमैया यांनी माहितीच्या अधिकारात जी कागदपत्रे मिळवली आहेत त्यात असे म्हटले आहे की, विभा साठे ज्यांच्याकडून अनिल परब यांनी जागा विकत घेतली असे त्यांचे स्टेटमेंट आहे. १ कोटी ८० लाखात ही जागा विकत घेतली. १ कोटी चेकने दिले व ८० लाख रोख दिले. जयराम देशपांडे, उपविभागीय अधिकारी, यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की, हा रिसॉर्ट नो डेव्हलपमेंट झोन मध्ये होता. जयराम देशपांडे यांचा ताबा ईडी कडून काल दापोली पोलिसांनी घेतला आहे.