मुंबई: अंगणवाडी सेविकेच्या प्रश्नावर आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा दरम्यान चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अंगणवाडी सेविकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार आदिती तटकरे, जयंत पाटील यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांना पगार वाढ मिळावी. अंगणवाडी वीज देयके सरकारने दिली नाहीत याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेला दूरध्वनी त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरण्यात येणारा अर्ज हा इंग्रजीत असल्याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तसेच राज्यातील अंगणवाडी मधील विज देयक गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये वीज नाही. सरकार या संदर्भात उदासीन असून त्याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आमदार अदिती तटकरे यांनी यावेळी केली.
अंगणवाडी सेविकांना भरघोस मानधन वाढ : विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्य सरकारने नुकतीच अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात एक बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या या बैठकीत अंगणवाडी सेविकांना 20 टक्के पगारवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांची देण्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर अंगणवाडी विजयकांसाठीही पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. अंगणवाडी सेविकांसाठी देण्यात आलेले मोबाईल आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या मोबाईलच्या माध्यमातून जे अर्ज भरले जातात ते अर्ज मराठी भाषेत असावेत यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.