मुंबई- पालिकेचा देवनार पशुवधगृह दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बकरी ईदसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारपर्यंत बाजारात 1 लाख 90 हजार शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. यातील आतापर्यंत 60 हजार शेळ्या-मेंढ्याची विक्री झाली आहे. पालिकेच्या 64 एकरच्या परिसरात वसलेल्या पशुवधगृहात यावर्षी उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्य व परराज्यातून आलेले व्यापारी व ग्राहक यांना खरेदी-विक्रीतील अडथळे दूर झाले आहेत.
बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृहात 2 लाख बकऱ्यांची आवक येत्या सोमवारी मुंबईसह देशभरात बकरी ईद साजरी होणार आहे. यासाठी देवनार पशुवधगृह सज्ज झाला आहे. पशुवधगृहात शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरतो. याच बाजारच्या पहिल्या दिवशी देवनार पशुवधगृहात 18 हजार 577 शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. बकरी ईदपर्यंत हा आकडा 3 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 64 एकर जागेत वसलेल्या या देवनार पशुवधगृहात या वर्षी 90 हजार चौरस मीटर जागा खास शेळ्या-मेंढ्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यातून या ठिकाणी शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही पशुवधगृहातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाणी, पशूंची आरोग्य आणि विजेची देखील पुरेपूर व्यवस्था पालिकेने केली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असेल. तसेच पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पशुवधगृहात बकरे आणि पैसे चोरीच्या समस्यावर आळा
दरवर्षी बकरी ईदनिमित्त पशुवधगृहात भरलेल्या बाजारात मोठय़ा प्रमाणात बकऱ्यांची चोरी होत असे आणि हेच बकरे पुन्हा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असायचे. याबरोबर व्यपाऱ्याचे बकरे विक्रीचे पैसे मोठ्या प्रमाणात चोरी होत. यावर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने यावर्षी पशुवधगृहातच बँक निर्माण केली असून प्रत्येकाचे खाते तात्काळ खोलून एटीएमसह व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच प्रत्येक व्यापाऱ्याला बारकोड असलेले ओळखपत्र दिले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांची सर्व माहिती, त्याने विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्यांची माहिती उपलब्ध असेल. ओळखपत्र नसलेली व्यक्ती याठिकाणी शेळ्या- मेंढ्या विक्री करू शकणार नाही, तर बकरी विकत घेणाऱ्या ग्राहकाला देखील याठिकाणी बारकोड असलेले गेट पास देण्यात आले आहेत.