मुंबई : रविवारी मुंबईत झालेल्या 18 व्या टाटा मॅरेथॉनमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी देखील विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिव्यांग टाटा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत अनेक दिव्यांग नागरिकांनी व्हीलचेअरवर बसून, सहभाग घेतला होता. यात आकर्षणाचा विषय ठरले ते सीमेवर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेले जवान. पुण्याच्या खडकी येथील सैनिक क्वार्टर मधून आलेले तब्बल सात दिव्यांग जवान या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
12 वर्ष सैन्यदलात कार्यरत :यापैकीच एक सीमेवर कर्तव्य बजावत असताना अपंगत आलेले माजी सैनिक रामदास मोरे यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. 'ईटीव्ही'शी बोलताना मोरे यांनी सांगितले की, 'मी बारा वर्ष सैन्यदलात सेवा दिली. ड्युटीवर असतानाच माझा अपघात झाला आणि मला अपंगत्व आलं. मग मी खडकी येथील आमच्या सेंटरमध्ये आलो. हे सेंटर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही सैन्य दलांमध्ये सेवा बजावताना, जेव्हा एखाद्या जवानाला अपंगत्व येतं त्या जवानांच्या पुनर्वसनासाठी हे सेंटर सुरू करण्यात आलं आहे.'