मुंबई- राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. या काळामध्ये राज्यांमध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा सोशल मीडियातून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेल हे विशेष पथक सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात 12 एप्रिलपर्यंत एकुण 176 सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये कोल्हापूर 14, बीड 12, जळगाव 12, पुणे ग्रामीण 11, मुंबई 11, जालना 9, नाशिक ग्रामीण 8, सातारा 7, नांदेड 7, परभणी 6, नागपूर शहर 5, नाशिक शहर 5, ठाणे शहर 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 5, गोंदिया 4, भंडारा 3, अमरावती 3, सिंधुदुर्ग 3, नंदुरबार 2, नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, हिंगोली 1 यांव्यतिरिक्त 31 इतर गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
सायबर सेलनुसार राज्यभरात व्हाट्सअॅप संदेश फॉरवर्ड प्रकरणी तब्बल 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी 55 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर टिक टॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे विवादास्पद ट्विट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्य सोशल माध्यम ज्यात ऑडिओ क्लिप, युट्युब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आतापर्यंत 36 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 114 आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे.