महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोस्टल रोडचे 17 टक्के काम पूर्ण, 7 जानेवारीला सुरू होणार पहिल्या बोगद्याचे काम; पालिका आयुक्तांची माहिती - मुंबई कोस्टल रोड न्यूज

मुंबईमध्ये कोस्टल रोडचे बांधकाम वेगात सुरू आहे. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे ध्येय आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे १७ टक्के काम पूर्ण झाले आहेत. लवकरच बोगदे खोदण्याच्या कामालाही सुरुवात होणार आहे.

Coastal Road
कोस्टल रोड

By

Published : Dec 21, 2020, 11:15 AM IST

मुंबई - महानगरपालिका व महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण झाले असून कोस्टल रोडसाठी पहिला बोगदा खोदण्याचे काम 7 जानेवारीला सुरू होईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

असा असेल कोस्टल रोड

17 टक्के काम पूर्ण, 1 हजार 281 कोटी खर्च -

मुंबईमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी फ्री वे बनवण्यात आला आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कमी वेळ लागावा म्हणून कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. कोस्टल रोडचे काम तीन टप्यात होणार असून अमरसन्स गार्डन प्रिन्सेस स्टिट ब्रिज ते वरळी सिलिंक असा पहिला टप्पा मुंबई महानगरपालिका तयार करत आहे. यासाठी पालिका 12 हजार 721 रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी 1 हजार 281 कोटी खर्च करण्यात आले. कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

'मावळा' खोदणार बोगदे -

कोस्टल रोड पूल आणि भुयारी मार्गाद्वारे उभारण्यात येत आहे. त्यासाठी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड मशीन आणण्यात आली आहे. या मशीनचा व्यास 39.6 फूट आहे. सर्वात मोठा व्यास असलेली ही मशीन आहे. या मशीनला 'मावळा' असे नाव देण्यात आले आहे. ही मशीन पूर्ण तयार झाली असून बोगदे खोदण्यास सज्ज झाली आहे. नवीन वर्षात 7 जानेवारीला कोस्टल रोडसाठी समुद्राखालून 400 मिटरचे बोगदे खोदण्याचे काम सुरू होईल असे आयुक्तांनी सांगितले.

टीबीएम मशीन 'मावळा

समुद्रात पडणार भराव -

कोस्टल रोडच्या कामासाठी अरबी समुद्रात 300 एकर जमिनीवर भराव टाकला जाणार आहे. त्यापैकी 175 एकर जागेवर भराव टाकण्यात आला आहे. अजून 102 एकर जागेवर भराव टाकण्याचे काम बाकी आहे, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

काय आहे कोस्टल रोड?

पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी 'शामलदास गांधी उड्डाणपूल' (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते 'राजीव गांधी सागरी सेतू' (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. १६ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार, कोळीवाडे आणि ब्रिचकॅन्डी येथील रहिवासी व काही सामाजिक संस्थांनी विरोध करत उच्च न्यायालयात या प्रकल्पाला आव्हान दिले होते.

समुद्री जीवांच्या रक्षणासाठी इको फ्रेंडली विटांचा वापर -

कोस्टल रोडमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामासाठी असलेली स्थगिती उचलल्यानंतर पालिकेने समुद्री जीव आणि कोळी बांधवांची गंभीर दखल घेतली आहे. सिमेंट काँक्रीटच्या बांधकामांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्री जीवांना धोका निर्माण होऊ नये म्हणून इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारित इको फ्रेंडली विटा वापरल्या जात आहेत. या विटांचा थर कोस्टल रोडच्या भिंती आणि पिलरच्या बाजूला लावण्यात येणार आहे. या विटांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्री जीवांचे प्रजनन होणार आहे. यामुळे मच्छीमारांनाही आपला व्यवसाय करणे सोपे होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details