नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) एनआरआय सागरी पोलिसांनी (NRI Coastal Police Action) 24 तासाच्या आत (within 24 hours) तब्बल 17 लाख 4 हजार 400 रुपये किमतीच्या सोने चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा (17 lakh jewelery theft case solved) लावला आहे. 29 डिसेंबरला पेशाने वकील असलेल्या विमलभूषण नंदकिशोर भटनागर या ८५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरातून दागिने चोरी झाल्याचे एनआरआय पोलिसांना कळवले. तसेच आपले दागिने घरकाम करण्याऱ्या जोगिकुमार कुवर मुखिया (वय 47वर्षे) यानेच चोरले असल्याची तक्रारही नोंदवली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनआरआय पोलीस ठाणे व एनआरआय सागरी पोलिसांनी सीवूड्स सेक्टर 38 मधील केंद्रीय विहार सोसायटीतील भटनागर यांच्या घरी जावून चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीबाबत कोणतीही माहिती भटनागर यांचेकडे उपलब्ध नव्हती. आरोपीचा साधा पत्ता देखील त्यांना माहित नव्हता, तसेच आरोपीने चोरी केल्यानंतर आपला फोनही बंद केला होता. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांसाठी एक चॅलेंज होते. आरोपीचा फोन बंद होण्याचे लास्ट लोकेशन कोपरीगाव विरार आले. त्याचाच धागा पकडत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
सोशल मीडिया आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा फोटो मिळवला. गोपनीय बातमीदाराला आरोपीचा फोटो दिला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव, पो. उपनिरिक्षक उदय सोळंके, पो. उपनिरिक्षक योगेश पाटील यांच्या पथकाने वेळोवेळी माहिती घेत 24 तास शोध घेवून आरोपी हा विरार येथे असल्याची खात्री केली. त्यानंतर आरोपीचा विरार परिसरात शोध घेत असताना आरोपी विरारमधील कोपरीगावानजीकच्या कोपर तलावाजवळून जात असताना दिसला.
पोलिसांनी त्याला बड्या शिताफीने ताब्यात घेतले असून; त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपी विरोधात भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कडून 8 लाख 14 हजार 868 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील चोरी केलेल्या दागिन्यांचे सोनाराकडून व्हॅल्युएशन केले असता, फिर्यादीने सांगितलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने खोटे असल्याचे समोर आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे (परिमंडळ 01) सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी दागिने चोरीच्या केलेल्या इन्स्टंट तपासाची चर्चा सध्या नवी मुंबईकर करताना दिसत आहेत.