मुंबई :संगीत क्षेत्रात रॅप या कलेचा जन्म मुळात विद्रोहासाठी झाला. रॅप हे एक विद्रोही संगीत माध्यम आहे. तुमच्या ज्या काही भावना आहे, खंत आहे. ती या रॅप प्रकारातून तुम्ही अधिक प्रखरपणे मांडू शकता. आज घडीला तुम्ही अनेक प्रसिद्ध रॅप गायकांची गाणी ऐकली असतील. मात्र, यात प्रेम, मनोरंजन हेच फार दिसते. मुंबईतील गोवंडी सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहणारी तरुणी मात्र आपल्या रोजच्या जगण्यातील समस्या, तिच्या अडचणी ती तिच्या रॅपमध्ये मांडते. तिचे सामाजिक विषयांवरचे हे विद्रोही रॅप अनेक वेळा स्थानिक भागात चर्चेचा विषय ठरतात.
16 वर्षाची रॅपर सानिया :मुंबईतील या विद्रोही रॅपर तरुणीचे नाव सानिया मिस्त्री कयीमुद्दिन आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी प्रमाणेच एक झोपडपट्टी एरिया अशी गोवंडी भागाची ओळख आहे. अशा भागात सानिया राहते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली सानिया केवळ सोळा वर्षाची आहे. सानिया सध्या तिच्या भागात स्टार बनली आहे. सानिया सध्या बारावीत आहे. बारावीच्या परीक्षेची तयारी आणि सोबतच आपल्या रॅप गायनाचा छंद जोपासणे, ही दोन्हीही काम सानिया अगदी सहज पार पाडते. यात आपल्याला आनंद मिळत असल्याचे सानिया सांगते.
कशी वळली रॅप गायनाकडे :आपल्या या प्रवासाबाबत ईटीव्हीशी बोलताना सानियाने सांगितले की, आमच्या शाळेत अनेक जण रॅप ऐकतात. आमच्या ग्रुपमध्ये काहीजण रॅप ऐकत होते. त्यावेळी मी सहज म्हणाले हे काय ऐकता हे खूप सोपे आहे. मला कविता लिहिण्याचा सुद्धा छंद आहे. रॅप करण्याआधी मी कविता लिहायचे. त्यामुळे मी माझ्या मित्रांना रॅप हे कविते सारखेच असतात असे म्हणाले. यावर माझ्या मित्रांनी माझी खिल्ली उडवली आणि मला एक रॅप बनवायला सांगितला. मी त्यांना रॅप बनवून ऐकवला, त्यावेळी त्यांना माझे म्हणणे पटले. सोबत काही माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांनी मात्र मला सांगितले तू जे काही म्हटले ते खूप छान होते. तू अशीच आणखी गाणी तयार कर आणि तिथून माझा कवितेकडून गायनाकडे प्रवास सुरू झाला.