मुंबई -मागील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही अनेक कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने ( MSRTC ) अखेर संपकऱ्यांवर ( ST Worker Strike ) निलंबनाची आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. गुरुवारी (दि. ९) १५० एसटी कर्मचारी निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता दहा हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच एसटी महामंडळात रोजंदारीवर काम करणाऱ्या २ हजार २९ कामगारांची सेवा समाप्ती केली आहे.
१० हजार १८० कर्मचारी निलंबित -
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे तर खासगी वाहन चालक प्रवाशांची लूट करत आहेत. भरघोस वेतनवाढ देऊन परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गुरुवारी १५० एसटी कर्मचारी निलंबित केले आहे. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील २ हजार २९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार १८० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.