मुंबई: फेब्रुवारी संपला की वातावरणात उष्णता जाणवते. मार्च ते जून या काळात प्रचंड उन्ह तापते. त्यामुळे पाणी प्रश्न निर्माण होतो. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलबोगद्याला ठाणे याठिकाणी कूपनलिकेच्या खोदकामामुळे गळती लागली आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार ३१ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ तारखेपासून पुढील ३० दिवस मुंबई आणि ठाण्याला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
जलबोगद्याला गळती : मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा विविध सात धरणातून केला जातो. त्यापैकी ६५ टक्के पाणीपुरवठा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. जल बोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. दुरुस्तीसाठी जलबोगदा बंद करणे गरजेचे आहे.
१५ टक्के पाणी कपात :जलबोगदा दुरुस्ती दरम्यानच्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे सध्या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ३० दिवस १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.