मुंबई - कोरोनाचा फटका बांधकाम व्यावसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असते आणि बांधकाम क्षेत्रालाच चालना मिळते. मात्र, यंदा ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी बांधकाम क्षेत्रात निरुत्साह असून सर्व काम ठप्प आहे. आजच्या घडीला देशातील 15 लाख 62 हजार घरांचे काम 'लॉकडाऊन' आहे. त्यामुळे देशभरातील बिल्डर हवालदिल झाले आहेत.
कोरोनामुळे देशभरातील 15 लाख 62 हजार घरांचे बांधकाम 'लॉकडाऊन'
बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या अॅनरॉक या सर्व्हेक्षण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 7 मोठ्या शहरातील 15 लाख 62 हजार घरांचे काम बंद आहे. यात मुंबई महानगर प्रदेशातील 4 लाख 65 हजार घरांचा, तर दिल्ली परीक्षेत्रातील अंदाजे 4 लाख 25 घरांचा समावेश आहे.
बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या अॅनरॉक या सर्व्हेक्षण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 7 मोठ्या शहरातील 15 लाख 62 हजार घरांचे काम बंद आहे. यात मुंबई महानगर प्रदेशातील 4 लाख 65 हजार घरांचा, तर दिल्ली परीक्षेत्रातील अंदाजे 4 लाख 25 घरांचा समावेश आहे. पुण्यातील 2 लाख 62 हजार, तर बंगळुरूमधील 2 लाख 2 हजार घरांची काम ठप्प आहेत. कोलकाता येथील 90,670 तर हैदराबाद येथील 1 लाख 18 हजार घरांचे काम लॉकडाऊन झाले आहे.
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभर 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. तर कोरोनाचा कहर कधी संपणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे प्रकल्पाचे बांधकाम आणखी काही महिने बंद राहणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका या क्षेत्राला बसणार असून यातून बाहेर यायला बराच काळ लागणार आहे, तर दुसरीकडे प्रकल्प पूर्ण होण्यासही विलंब होणार असल्याने ग्राहकांचे घराचे स्वप्नही लांबणार आहे.