महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

15 ऑगस्टच्या‌ ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - महाराष्ट्र ग्रामपंचायती

कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री हसन मुश्रीफ
मंत्री हसन मुश्रीफ

By

Published : Aug 12, 2020, 5:45 PM IST

मुंबई -राज्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामपंचायतींच्या कामकाजात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जातात. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. या ग्रामसभा न घेतल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.

तथापि, राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारचे मेळावे, कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली असून लोकांना अधिक संख्येने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केल्यास होणाऱ्या गर्दीची स्थिती लक्षात घेता ती टाळण्यासाठी राज्यात ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचे यंदा आयोजन करण्यात येऊ नये. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
स्वातंत्र्यदिनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details