मुंबई -मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पावसाळ्यात रेल्वे गाड्या घाट विभागातून सुरळीत आणि विनाव्यत्यय धावाव्यात म्हणून रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची तयारी सुरू केली आहे. कर्जत लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाट विभागात विशेष भर देण्यात आले असून यंदाचा मान्सूनसाठी घाट मार्गावर 145 सीसीटीव्ही बसविण्याचे आणि घाटमाथ्यावरील 595 बोल्डर यशस्वीरित्या काढण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.
रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिल्या सूचना -दक्षिण-पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा इगतपुरी विभागातील मान्सून पूर्व कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केली आहेत. यादरम्यान त्यांनी कल्याण लोणावळा घाट विभागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेणेकरून पावसाळ्यात रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावतील. त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लॅंडस्लाइडच्या घटनांमुळे असुरक्षित आहे ज्यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, ही तत्परता भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर केलेले उपाय वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करेल.