मुंबई- सायन कोळीवाडा परिसरातील इयत्ता 9 वी तील मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तृतीयपंथी आई गावी गेली असताना मुलीने गळफास घेतला. ही घटना सोमवारी घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कलगी (वय 14) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
तृतीयपंथीच्या दत्तक मुलीची आत्महत्या, आई-वडिलांनी दिले होते मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून - मुंबई
सायन कोळीवाडा परिसरातील इयत्ता 9 वी तील मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सायन कोळीवाडा परिसरात 2006 मध्ये कालिमाता मंदिराजवळ एका दाम्पत्याने तृतीयपंथी मुलाला मंदिराच्या पायथ्याशी सोडून गेले होते. या दरम्यान मंदिराजवळ राहत असलेल्या पद्मावती या तृतीय पंथियाने या बाळाची जबाबदारी घेत त्यास दत्तक घेतले. तर जन्मतः तृतीयपंथी असलेल्या बाळाचे आईने कलगी, असे नाव ठेवले होते. कलगी मोठी झाली असता पद्मावतीने तिच्यावर लाखो रुपये खर्च करुन लैंगिक शस्त्रक्रिया करून तिला मुलीची ओळख दिली होती.
कलगी ही सायन कोळीवाडा परिसरात सनातन हायस्कूलमध्ये शिकत होती. ती नुकतीच 8 वी पास होऊन 9 वी च्या वर्गात गेली होती. 15 दिवसांपूर्वी कलगीची आई काही कारणास्तव तिच्या गावी गेली होती. तेव्हा कलगी कालिमाता मंदिरातील एका खोलीत एकटीच राहत होती. त्यावेळी सोमवारी या परिसरातील तिची काळजी घेणारे इतर तृतीयपंथी कलगीसाठी नाश्ता घेऊन गेले. त्यावेळी कलगीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. या संदर्भात अंटोप हील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.